इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाची स्थापना १९६२ साली झाली. विद्यापीठाच्या स्थापनेसोबत जे मोजके अधिविभाग सुरू झाले, त्यापैकी इतिहास अधिविभाग होय. ख्यातनाम इतिहासकार डॉ अप्पासाहेब पवार हे शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मिळून इतिहास विषयाची परिषद असावी अशी डॉ आप्पासाहेब पवार यांची इच्छा होती. डॉ आप्पासाहेब पवार यांच्या इच्छेला मूर्त स्वरूप प्राप्त व्हायला १९९३ साल उजाडले. इतिहास अधिविभागाचे तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. व्ही एस कदम यांच्या पुढाकाराने डॉ.बी.आर. कांबळे,डॉ. अरुण भोसले, प्राचार्य आर डी गायकवाड, सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.गजानन भिडे , वाईचे प्रा. वसंतराव जगताप, तळमावल्याचे प्रा. संभाजीराव मोटे, इस्लामपूरचे प्रा.एम.टी. जाधव, महावीर महाविद्यालयातील प्रा.एल.एम.पटवेगार, डॉ. बी.एन. सरदेसाई, फलटणचे प्रा.एम. जे. जाधव, गारगोटीच्या डॉ.सुशिला ओडीयार मॅडम, कुर्डूवाडीचे प्रा.नामदेव गरड, श्रीकांत देशपांडे, वाई महाविद्यालयाचे प्रा.डी.डी वाघचौरे यांच्या सहकार्याने परिषदेच्या कार्याला प्रारंभ केला.
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेचे कामकाज १९९३ पासून सुरु झाले. परंतु धर्मादाय आयुक्तांच्याकडे दिनांक २३ फेब्रुवारी १९९५ रोजी ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास प्राध्यापक परिषद, कोल्हापूर’ या नावाने रीतसर नोंदणी करण्यात आली.इतिहास परिषदेच्या कामात अधिक लोकांना सामावून घेण्याच्या दृष्टीने परिषदेच्या नावात ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर’ असा बदल करण्यात आला.आता परिषद चौथ्या दशकात पदार्पण करून अखंडपणे इतिहासाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. परिषद आपल्या अस्तित्वाचे व कार्याचे अर्धे शतक पूर्णत्वाकडे मार्गक्रमण करीत आहे.
एवढेच नव्हेतर परिषदेस समृद्ध ,वैचारीक, उज्ज्वल आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अपवाद वगळता दरवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयाच्या सहकार्याने अखंडीतपणे वार्षिक अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. नुकतेच आमच्या परिषदेचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात दि.१० व ११ जून २०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
आपली परिषद बदलत्या काळाची गरज लक्षात घेते आणि तेच बीज विषय म्हणून घेऊन परिषदांचे आयोजन करत असते. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो.