Welcome to Shivaji University History Confernce

Organization History

 

संस्थेचा इतिहास

शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 साली झाली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने शिवाजी विद्यापीठ हे कोल्हापूर जिल्ह्याकरिता मंजूर झाले. तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांचे शिवाजी विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी जे अधिविभाग चालू करण्यात आले त्यामध्ये इतिहास विभागही होता. कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार हे इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांचे इतिहास विषयावर अत्यंत प्रेम होते. इतिहास अधिभागातील विभाग प्रमुख व प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच संशोधनाकडेही सुरुवातीपासूनच लक्ष दिले पाहिजे याकरिता ते आग्रही होते. संशोधन कार्यात महाविद्यालयातील प्राध्यापकांनाही सामावून घेणे आवश्यक आहे अशी बाब इतिहास अधिभागाच्या लक्षात आली. त्याच्यातूनच डॉ. व्हि. एस. कदम, डॉ. बी. आर. कांबळे, डॉ. अरुण भोसले यांनी शिवाजी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक इतिहास संशोधन कार्यास जोडून घेण्याकरिता प्रयत्न करण्याचे ठरवले. याच्यातूनच ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास प्राध्यापक परिषद, कोल्हापूर’ या संस्थेची नोंदणी दि. 23 फेब्रुवारी 1995 रोजी करण्यात आली. डॉ. व्हि. एस. कदम हे या परिषदेचे पहिले संस्थापक अध्यक्ष होते. पुढे या परिषदेच्या कामकाजात व संशोधन कार्यात विद्यार्थ्यांना सहभाग करून घ्यावे असा विचार झाला आणि मथुबाई गरवारे महाविद्यालय, सांगली येथील अधिवेशनात परिषदेच्या नावात बदल करण्यात आला. ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद’ कोल्हापूर या नावाने परिषद ओळखली जाऊ लागली. शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेला 28 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या 28 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एकूण 24 अधिवेशने विविध महाविद्यालयात पार पडली. परिषदेचे 25 वे रौप्य महोत्सवी अधिवेशन शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिभागामध्ये संपन्न झाले. परिषदेचे आज एकूण जवळ जवळ 400 सभासद आहेत. परिषदेच्या कामकाजाकरिता शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.