सहाय्यक प्राध्यापक, क्रांतीसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा
शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद ही शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गेली ३० वर्षे निरंतर कार्य करणारी शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्य करणारी संस्था आहे. विविध प्रकारे संशोधन /अभ्यास करणाऱ्या सभासदांसाठी तसेच संशोधक विद्यार्थी,महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व नागरिकांसाठी वार्षिक अधिवेशने, व्याखाने आणि चर्चासत्रे आयोजित केली आहेत. इतिहास परिषदेची अधिवेशने संस्मरणीय स्वरुपाची अशी असतात.यामध्ये संशोधकांनी मांडलेले आपले संशोधन पेपर हे इतिहासाच्या क्षेत्रात नवी भर घालत असतात. तसेच प्रत्येक अधिवेशनावेळी अध्यक्षांनी केलेली भाषणे ऐतिहासिक ठेवा आहेत. इतिहासाची वेध घेणारी तसेच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचा ध्यास घेणारी एक प्रगल्भ ऐतिहासिक, शैक्षणिक, सामाजिक चळवळ म्हणून शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेची ओळख आहे.
२३ फेब्रुवारी १९९५ रोजी शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेची स्थापना झाली. या संस्थेच्या स्थापनेपासून इतिहास अध्ययन व संशोधन प्रक्रियेत नवीन मापदंड या संस्थेने निर्माण केले आहेत. महाराष्ट्र राज्य हे ज्ञानसंपन्न आणि प्रतिभा संपन्न राज्य असून सामाजिक परिवर्तनाचे भक्कम बीज असणाऱ्या भक्कम इतिहास अभ्यासकांची एक फळी निर्माण करण्याचे अमूल्य असे कार्य मराठी इतिहास परिषदेने केले आहे.
विविध उपक्रमांमध्ये सातत्य, नियमीत वार्षिक अधिवेशन, माध्यमातून परिवारातील सदस्यांना प्रोत्साहन देणारी ही ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद’ होय. प्रारंभीच्या काळात परिषदेच्या जडणघडणीमध्ये डॉ. व्ही.एस.कदम, डॉ. बी.आर.कांबळे, डॉ. अरुण भोसले, प्राचार्य आर.डी.गायकवाड,डॉ.जयसिंगराव पवार,गजानन भिडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यानंतर परिषदेच्या वाटचालीमध्ये डॉ. मधुकर जाधव, जे.वाय. भोसले,प्राचार्य टी.एस. पाटील,डॉ नंदा पारेकर,डॉ.बी.एन सरदेसाई यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव,खजिनदार,सहसचिव व सदस्य यांचे परिषदेला मिळालेले सहकार्य विसरता येणार नाही. शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेची वाटचाल यशस्वी, समृध्द होण्यासाठी सर्व सभासदांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे. यापुढेही असेच सहकार्य मिळत राहील. त्यामुळे परिषदेची वाटचाल अधिक यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. आपल्या सर्वांच्या सहभागाने परिषदेची वाटचाल अधिक समृध्द व्हावी अशी अपेक्षा आहे.